Ad will apear here
Next
अत्रे, बांदेकरांच्या साहित्याने घडवले आणि लिहिते केले : रामदास फुटाणे
रामदास फुटाणे‘वात्रटिका’ नावाचा नवा प्रकार मराठी साहित्यात लोकप्रिय करणारे कवी, चित्रकार, तसेच चित्रपट लेखन, दिग्दर्शन, निर्मिती क्षेत्रातही मुशाफिरी केलेले ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे आज, १४ एप्रिल २०१७ रोजी वयाच्या पंच्याहत्तरीत पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने विवेक सबनीस यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद....
................ 


- फुटाणेजी, अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना तुम्ही आत्मचरित्र लिहिण्याचा संकल्प सोडला आहे, असे समजले. ते कधी बाहेर येणार व त्यात काय असेल? 
- आत्मचरित्र लिहायला मी अजून प्रत्यक्ष सुरुवात केली नसली, तरी त्याचा कच्चा आराखडा तयार आहे. माझ्या नजरेतून माझ्याच गतकाळाकडे बघताना माझ्या जीवनाचा भाष्यकार म्हणून त्यात एक वेगळी गंमत तर आहेच. शिवाय त्यात माझ्या आयुष्यातील सर्व महत्त्वाच्या टप्प्यांचा सविस्तर मागोवा असेल. त्यात माझी चित्रकला शिक्षक, सिनेमा निर्माता, साहित्यिक व कवी, राजकारण आणि आमदारकी अशी सगळी वाटचाल येईल. हे आत्मचरित्र जास्तीत जास्त वाचकांपर्यंत व विशेषत: तरुणांपर्यंत  पोहोचवण्यासाठी यासाठी त्याचे ई-बुकही प्रसिद्ध करणार आहे. माझे मित्र असलेले ‘बुकगंगा’चे मंदार जोगळेकर या कामात मदत करतील. माझी आधीची पुस्तकेही जोगळेकरांनी ई-बुकच्या  माध्यमातून प्रसिद्ध केली आहेत. 

- आधी आपण चित्रकलेचे शिक्षक होतात. नंतर अचानक ‘सामना’ या सिनेमाचे निर्माते झालात व पुढे आणखी दोन सिनेमेही काढलेत. आयुष्याला हे अनपेक्षित वळण कसे लागले? 
- हो. या काळात आचार्य अत्रे यांचे ‘मी कसा झालो’ हे पुस्तक माझ्या वाचनात आले. ते मला अतिशय प्रेरणादायी ठरले. स्वत: अत्रे अतिशय प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत मोठे झाले होते. तीच प्रेरणा मला सिनेमानिर्मितीसाठी उपायोगी ठरली. अत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आपली वाट आपण शोधून काढायला मला खूप मदत झाली! ‘सामना’, ‘सर्वसाक्षी’ व ‘सुरवंता’ असे मला भावलेल्या विषयांवरील तीन सिनेमे मी काढू शकलो. 

- पण केवळ सिनेमा निर्मितीपुरते तुम्ही थांबला नाहीत; तर पुढे तुम्ही विडंबनकवी किंवा ‘वात्रटिका’कारही बनलात. तुमच्या जीवनात इतका मोठा बदल कसा काय घडला?
- गेल्या पिढीचे विनोदी लेखक दत्तू बांदेकर यांचे साहित्यही या काळात माझ्या वाचनात आले होते. विशेष करून त्यांचे विडंबनपर लेखन व काव्य मला खुणावत होते. शिवाय आमच्या नगर भागातील जामखेड येथे जत्रेच्या निमित्ताने होणारे तमाशे मी आवडीने पाहत असे. त्याच्यातील टिंगल व एखाद्या विषयाचे विडंबन माझ्या कवितेतही उतरले. अर्थात, हे विडंबन करताना मी माझी भाषिक पातळी कधीच सोडली नाही. त्या अर्थाने मी ‘वात्राटिका’कार यापेक्षा भाष्यकवी आहे! ‘भारत हा माझा कधी कधी देश आहे’ ही कविता लोकांना आवडल्यानंतर मग मी कधीच मागे वळून पाहिले नाही. 

- कवीला कोणताही धर्म वा पक्ष नसतो. तुम्ही काँग्रेसच्या विचारसरणीचे असताना भाष्यकविता करताना तो तटस्थपणा जपू शकलात? 
- माझ्या आधीच्या सर्व कविता दिल्ली व मुंबईतील काँग्रेस राजवटीवरच्याच आहेत. तसेच भाष्यकावितेत सत्तेवर असलेल्या पक्षावरच भाष्य करता येते. आता चित्र बदलले आहे व मी सध्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी व राज्यातील युती सरकारवर भाष्यकविता लिहिल्या आहेत. त्या तितक्याच उत्स्फूर्तपणे बाहेर आल्या आहेत. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय व त्यातले व्यंगात्मक बोचरे मर्म लोकांपर्यंत पोहोचवायचा सर्जनशील आनंद वेगळाच असतो! 

- तुम्ही व तुमच्याबरोबरील कवी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या भागात कविता सादर करणार आहात, असे कळले. वास्तविक यापूर्वीही तुमची कवींची फौज महाराष्ट्रात ठिकठिकाणी कवीसंमेलने करत फिरत होती, ती कोणत्या भूमिकेतून? 
- निराशेने ग्रासलेल्या शेतकऱ्यांपुढे काही आशादायी व सकारात्मक चित्र निर्माण करण्यासाठी मी ही कविसंमेलने मुद्दाम आयोजित करतो. येत्या मे महिन्यातील १५ दिवस व त्यानंतर पावसाळा संपल्यावर सप्टेंबरपासून ही संमेलने विदर्भ, मराठवाडा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये होतील. आमीर खानचे ‘पानी फाउंडेशन’ आणि नाना पाटेकरांची ‘नाम’ अशा संस्था शेतकऱ्यांसाठी काही मोलाचे काम करत असतील, तर आपणही आपला वाटा उचलाला हवा, या विचारातूनच मी या क्षेत्रात नव्या उमेदीने उतरतो आहे. माझ्या वात्रटिका व इतर कवींच्या गंभीर कविताही या संमेलनातून सादर केल्या जातील. मुळात माझ्याकडे राज्यातील निवडक चांगल्या शंभर ते दीडशे  कवींचा फौजफाटा असतोच! १९८६पासून मी कविसंमेलने घेण्याचे कारण आहे. तेव्हा मंगेश पाडगावकर, वसंत बापट व विंदा करंदीकर या सुप्रसिद्ध त्रिकुटाची जाहीर कविसंमेलने होत असत. पुण्या-मुंबईसह राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यात अनेक चांगले कवी आहेत. त्यांना हाताशी धरून लोकांपुढे सादर करणे हे मी एक ‘चळवळ’ म्हणून सुरुवातीपासूनच करत आलोय. पुण्याचे संदीप खरे, मीरा शिंदे, मुंबईचे अशोक नायगावकर, नीरजा, तर बाहेरच्या कवींमध्ये नितीन देशमुख व कै. संजीवनी खोजे यांच्यासारखे गुणी कवीही मला भेटले.  

- शहर असो वा ग्रामीण भाग असो, समाजात आज कशाचेच काही वाटेनासे झाले असल्याची प्रवृत्ती वाढताना दिसते. तुमच्या भाष्यकाराच्या भूमिकेतला विडंबन कवितांचा समाजावर काही परिणाम होताना दिसतो का? 
- एकूणच संवेदनशीलता हरवत चालली आहे, हे खरं आहे. आज लोक वेगळ्या पद्धतीने याकडे पाहू लागले आहेत. मला आशा आहे, की त्याचा परिणाम होईल. माझ्या भाष्यकवितेतील संवेदना नक्की पाझरेल किंवा झिरपेल. आज नाही तर १०० वर्षांनी तरी माझ्या कवितांचा परिणाम  दिसेल. परिस्थिती काहीही असली तरी आपण कवितेच्या माध्यमातून सातत्याने बोलत राहिले पाहिजे. 

- सध्याचे साहित्य, मालिका किंवा रिअॅलिटी शोसारख्या विविध माध्यमांतून विनोदाची पातळी घसरते आहे, असे वाटते का? कायिक विनोदाचे आणि फालतू कोट्या करण्याचे प्रमाण वाढते आहे, असे वाटते का? निखळ विनोदी साहित्याच्या निर्मितीसाठी काय करायला हवे?
- चांगले दर्जेदार विनोदी साहित्य निर्माण करण्यासाठी लेखकानेच त्याच्या अस्सल अनुभूतींचा वापर करायला हवा. ती लेखकाचीच जबाबदारी आहे. बाकी रिअॅलिटी शोज व मालिकांबद्दल मी काही बोलावे असे नाही. 

- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर काही उपयोग होईल, असे वाटते का? 
- का नाही? नक्कीच उपयोग होईल! केंद्र सरकारकडून त्यासाठी मिळणारे २०० ते ३०० कोटी रुपये मराठी भाषेच्या विकासासाठी परिणामकारकरीत्या वापरता येतील. याचा फायदा मराठीसाठी आपण जास्तीत जास्त करून घ्यायला हवा. 

- अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’तर्फे हार्दिक शुभेच्छा! 
- धन्यवाद!

............

कटपीस, सफेद टोपी लाल बत्ती, चांगभलं, भारत कधी कधी माझा देश आहे, फोडणी, कॉकटेल
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZONBB
Similar Posts
माझा विनोद मनुष्यस्वभावाच्या जवळ जाणारा : द. मा. मिरासदार ज्येष्ठ विनोदी साहित्यिक प्रा. दत्ताराम मारुती मिरासदार तथा ‘दमा’, आज, १४ एप्रिल २०१७ रोजी वयाची नव्वदी पूर्ण करत आहेत. या वयातही ते अगदी दिलखुलासपणे बोलतात! त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांची भेट घेतली असता याचा प्रत्यय आला. या भेटीदरम्यान विवेक सबनीस यांनी ‘दमां’शी केलेली ही बातचीत... ..
दिनदर्शिकेतून उलगडले ‘स्मरणरम्य पुणे’ राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि ऐतिहासिक शहर असा नावलौकिक असलेल्या पुण्याच्या जुन्या आठवणी जागवणारी ‘स्मरणरम्य पुणे’ ही दिनदर्शिका नुकतीच प्रकाशित झाली आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील पुण्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी, वाड्यांसारख्या वास्तूंचे सौंदर्य टिपणारी, तसेच महात्मा गांधी, इंदिरा गांधी, बॅ
‘महाभारत हे केवळ धर्मयुद्ध नव्हते’ : डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांची विशेष मुलाखत आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केलेले पुण्यातील ज्येष्ठ प्राच्यविद्यापंडित डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांचे १९ ऑगस्ट २०२० रोजी निधन झाले. ते १०२ वर्षांचे होते. (जन्मतारीख : १४ फेब्रुवारी १९१८) संस्कृत भाषा, ऋग्वेद, महाभारत, निरुक्ता, तसेच पाली, प्राकृत भाषेतील संशोधन आणि अवेस्ता या पारशी ग्रंथाचे संशोधन अशा विविध विषयांत डॉ
पुण्यातील गणपती उत्सवाची रोमहर्षक सव्वाशे वर्षे! पुण्यात सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे १२५वे वर्ष आहे. या कालावधीत ही परंपरा जपली तर गेलीच; पण काळानुसार त्यात बदल होऊन ती अधिकाधिक समृद्ध होत गेली. या १२५ वर्षांतील काही टप्प्यांबाबत काही मान्यवरांनी सांगितलेल्या किंवा लिहून ठेवलेल्या आठवणींना उजाळा देणारा ज्येष्ठ पत्रकार विवेक सबनीस यांचा हा लेख

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language